लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव ट्रक नदीकाठच्या झाडाला धडकला. त्यात चार म्हशींचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर ट्रकचालकासह बाहेर फेकली गेलेली काही जनावरे जखमी झाली. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-गडचिराेली मार्गावरील मरू नदीच्या पुलावर बुधवारी (दि. ५) सकाळी घडली.
राजू मदन पाल (वय ४५, रा. यशोधरानगर, नागपूर) असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे. ताे एमएच-३५/एजे-१२४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १६ म्हशी आणि दाेन रेडे अशी १८ जनावरे काेंबून नागपूरच्या दिशेने वेगाने जात हाेता. भिवापूर शहरालगतच्या मरू नदीवरील पुलाजवळ त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित ट्रक पुलाजवळील झाडाला धडकला. यात ट्रकचालक राजू पाल याला गंभीर दुखापत झाली; तर आतील चार म्हशींचा मृत्यू झाला.
शिवाय, या धडकेमुळे ट्रकमधील काही जनावरे बाहेर फेकली गेल्याने त्यांनाही दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करून मृत गुरांची विल्हेवाट लावली. शिवाय, जखमी राजू पालला उपचारासाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमी गुरांवर उपचाराची साेय करीत त्यांना पिंपळगाव (जि. भंडारा) येथील गाेरक्षणामध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या प्रकरणी भिवापूर पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार महेश भाेरटेकर करीत आहेत.