लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी नागपूर-भंडारा महामार्गावरील लिहिगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, चालकास अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १२) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सचिन गुलाबराव शेंद्रे (२५, रा. टेकेपार, ता. आमगाव, जिल्हा गाेंदिया) असे अटक करण्यात आलेल्या टिप्पर चालकाचे नाव आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नागपूर-भंडारा महामार्गावरून नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लिहिगाव शिवारात नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-४९/एटी-१३० क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली. त्यात रेती असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली.
टिप्परमधील रेती विना राॅयल्टी असल्याचे चाैकशीअंती स्पष्ट हाेताच पाेलिसांनी टिप्परचालक सचिन शेंद्रे यास अटक केली. शिवाय, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे टिप्पर मालक नितीन ऊर्फ मोनू गणवीर (३५, रा. भंडारा) याच्या विराेधतही गुन्ह्याची नाेंद केली. या कारवाईमध्ये त्याच्याकडून १५ लाख रुपयांचा टिप्पर व ४० हजार रुपयांची रेती असा एकूण १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली असून, ती रेती वैनगंगा नदीच्या काेठुर्णा (जिल्हा भंडारा) येथील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, प्रमोद वाघ, मनोहर राऊत, अनिल बाळराजे, नीलेश यादव, ललित शेंडे यांच्या पथकाने केली.