लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांनी जुनी कामठी (ता. पारशिवनी) येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण चार लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १७) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुधांशू धनपाल मेश्राम (२३, रा. जुनी कामठी, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना जुनी कामठी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एमएच-३२/एजे-०१७७ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्या वाहनात रेती आढळून आल्याने पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली.
ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनचालक सुधांशू यास ताब्यात घेत अटक केली आणि त्याच्याकडून रेती व वाहन जप्त केले. या कारवाईमध्ये चार लाख रुपये किमतीचे वाहन आणि दाेन हजार रुपयाची अर्धा ब्रास रेती असा एकूण चार लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत कदम, येशू जोसेफ, कुणाल पारधी, राजेंद्र गौतम, राहुल रंगारी, संदीप गेडाम, संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशील तट्टे यांच्या पथकाने केली.