लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील गरूड चाैकात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी शहरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शहरातील गरूड चाैकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यात त्यांनी एमएच-४०/बीजी-३८६६ क्रमांकाचे नागपूरच्या दिशेने जात असलेले मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्यात रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात वाहनातील रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती रेती वारेगाव (ता. कामठी) शिवारातील कन्हान नदीच्या पात्रातील असल्याचेही वाहनचालकाने पाेलिसांना सांगितले.
परिणामी, पाेलिसांनी वाहनचालक आकाश जितेंद्र सोमकुवर (२०, रा. वारेगाव, ता. कामठी) याच्यासह वाहन मालकास अटक केली. त्यांच्याकडून २ लाख रुपयांचे वाहन आणि ३ हजार रुपयांची रेती असा एकूण २ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक श्याम वारंगे, विनायक आसतकर, मनोहर राऊत, नीलेश यादव, रोशन पाटील यांच्या पथकाने केली.