लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : वर्धेहून नागपूर मार्गे दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात नेली जात असलेली दारू पकडण्यात एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांना यश आले. यात पाेलिसांनी दाेघांना अटक केली असून, त्यांच्याकडून बाेलेराे आणि विदेशी दारूच्या बाॅटल्स असा एकूण ३ लाख ५४ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा येथे करण्यात आली.
राहुल संजय सपारिया (२१) व सेवमल सेवल वलेचा (५२) दाेघेही रा. वर्धा, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, राहुल हा वाहन चालवीत हाेता. वर्धा व चंद्रपूर दाेन्ही जिल्ह्यात दारूबंदी असली तरी त्या जिल्ह्यांमध्ये माेठ्या प्रमाणात दारूची चढ्या भावाने विक्री केली जाते. हाेळीच्या काळात दारूच्या मागणीत वाढ हाेत असल्याने, पाेलीस दारूच्या अवैध वाहतूक व विक्रीवर नजर ठेवून आहेत. त्यातच वर्धा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने दारूची वाहतूक केेली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा येथे नाकाबंदी केली हाेती.
यात पाेलिसांनी एमएच-३४/एबी-९४४ क्रमांकाची बाेलेराे थांबवून झडती घेतली. त्या बाेलेराेत त्यांना बीअरच्या ९६ व व्हिस्कीच्या १९२ बॉटल्स आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे तसेच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी वाहनातील दाेघांना अटक केली. यात त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची बाेलेराे आणि ५४ हजार ७२० रुपये किमतीची दारू असा एकूण ३ जाख ५४ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे, हवालदार इकबाल शेख व प्रफुल राठोड यांच्या पथकाने केली.