भिवापूर : नागपूर येथून गडचिरोलीला दुचाकीने विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीच्या भिवापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दुचाकीसह ७ हजार रुपयाची दारू असा एकूण ६७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आली. रोहित रमेशलाल नाथानी (रा. समतानगर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी बुधवारी (दि.२४) रात्री ९ वाजताच्या सुमारास अॅक्टिव्हा क्र. एम.एच. ५८ बी.पी. २६१७ या दुचाकीने नागपूर ते गडचिरोली अशी विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती ठाणेदार महेश भोरटेकर यांना मिळाली होती. लागलीच सहायक निरीक्षक शरद भस्मे यांच्या पथकाने राष्ट्रीय मार्गावर सापळा रचून पेट्रोलिंग सुरू केले. दरम्यान, नागपूरकडून गडचिरोलीच्या दिशेने जात असलेल्या भरधाव दुचाकीवर संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवून झडती घेतली असता आरोपीकडे ७ हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बॉटल आढळल्या. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शरद भस्मे, नरेंद्र पटले, दिपक जाधव यांनी ही कारवाई केली.
दारूची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:10 AM