लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : पाेलिसांनी डिफेन्स पाॅवर हाउस परिसरात केलेल्या कारवाईमध्ये देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कारचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून कार व दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ६ हजार ८८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ४) रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रवीण सीताराम धाकरे (५१, रा.कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) असे अटकेतील आराेपी कारचालकाचे नाव आहे. वाडी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून कारमधून काेंढाळी (ता. काटाेल)च्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने पथकाने डिफेन्स पाॅवर हाउस परिसरात पाहणी केली. त्यांना या भागात एमएच-४०/ए- ३७२० क्रमांकाची कार उभी दिसली. संशय बळावल्याने पाेलिसांनी कारचालक प्रवीणला ताब्यात घेत कारची लगेच झडती घेतली.
पाेलिसांना त्या कारमध्ये देशी दारूच्या ६२४ बाटल्या व विदेशी दारूच्या ९६ बाटल्या आढळून आल्या. ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे, तसेच ती दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी कार, देशी व विदेशी दारूच्या बाटल्या, माेबाइल हॅण्डसेट व एक हजार रुपये राेख असा एकूण २ लाख ८ हजार ८८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या कारची किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक साजिद अहमद, हवालदार सुनील मस्के, ईश्वर राठोड यांच्या पथकाने केली.