बेला : पाेलिसांनी बाेरीमजरा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, एकूण ८ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
बेला पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बाेरीमजरा शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली. यात त्यांनी एमएच-४०/एके-७३०२ क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली. ती रेती विनाराॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी चालकासह रेती व टिप्पर ताब्यात घेतला. ती रेती पवनी येथील नदीतून आणली असल्याचे टिप्परचालकाने पाेलिसांना सांगितले. या कारवाईमध्ये ८ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी बेला पाेलिसांनी टिप्परचालक आशिष प्रकाश वाघ, रा. नागभिड, जिल्हा चंद्रपूर याच्या विराेधात भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार अजय चाैधरी करीत आहेत.
...