लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : पाेलिसांनी डाेनघाट परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून टिप्पर व रेती असा एकूण १५ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २३) सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
निरंजन हेमराज सूर्यवंशी (३६, रा. सावंगी, ता. सावनेर) असे पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या टिप्परचालकाचे नाव आहे. खापा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना डाेनघाट परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात पाेलिसांना एमएच-४०/एके-०८५५ क्रमांकाचा टिप्पर येताना दिसला.
त्यांनी हा टिप्पर थांबवून झडती घेतली असता, त्यात रेती आढळून आली. कागदपत्राच्या तपासणीअंती ती रेतीची विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी टिप्पर चालक निरंजन सूर्यवंशी यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून टिप्पर व त्यातील रेती जप्त केली. या कारवाईमध्ये १५ लाख रुपयाचा टिप्पर व ८ हजार रुपयाची रेती असा एकूण १५ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अजय ठाकरे यांनी दिली असून, ती रेती कन्हान नदीतील असल्याचे सांगितले. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.