लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पाेलिसांच्या पथकाने शहरालगतच्या पांदण रस्त्यावर केलेल्या कारवाईत रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांच्याकडून ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. २९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना शहरालगतच्या हनुमान नगर पांदण रस्त्यावरून विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. संशय आल्याने पाेलिसांनी हा ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्याच्या विनाक्रमांकाच्या ट्राॅलीत कन्हान नदीतील रेती आढळून येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला.
या प्रकरणात तीन लाख रुपयांचा ट्रॅक्टर व तीन हजार रुपयांची रेती असा एकूण ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे यांनी दिली. ट्रॅक्टर चालक संताेष केशव उईके (२८, रा. कन्हान, ता. पारशिवनी) व मालक मुरलीधर बाबूराव येलुरे (५३, रा. इंदिरानगर, कन्हान, ता. पारशिवनी) यांच्याविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदवून दाेघांनाही सूचनापत्र देऊन साेडून दिल्याची माहितीही त्यांनी दिली.