लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : पाेलिसांनी वाडी नजीकच्या लावा टी पाॅईंटजवळ केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात एकूण ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ही कारवाई मंगळवारी (दि. २९) सकाळी ५.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
निखील सुरेश काेल्हे (२२, रा. वलनी पारडी, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे तर अलिन डहरवाल, रा. वाडी असे मालकाचे नाव आहे. वाडी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना वाडी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लावा टी पाॅईंटवर नाकाबंदी केली. यात त्यांनी एमएच-४०/बीजी-२७५५ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट झाले.
ती अनिल डहरवाल यांच्या सांगण्यावरून वासायराघाट, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश येथून आणल्याचे निखिलने पाेलिसांना सांगितल्याने पाेलिसांनी अनिल डहरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांचा शाेध सुरू केला आहे. या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रक आणि २५ हजार रुपयांची साडेचार ब्रास रेती असा एकूण ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नरूल हसन यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.