लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी बिना संगम (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात पाेलिसांनी दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून ट्रक व रेती असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बिना संगम परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या भागाची पाहणी केली. त्यांनी संशय आल्याने एमएच-४०/बीएल-६७७२ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ट्रकमधील रेती ही विना राॅयल्टी वाहून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले.
त्या रेतीची उचल ही कनहान नदीवरील बिना संगम रेतीघाटातून करण्यात आली असून, ती रेती बिना संगम गावालगतच्या स्मशानभूमीजवळ साठवून ठेवण्यात आली हाेती, अशी माहिती पाेलिसांनी दिली. त्यामुळे पाेलिसांनी ट्रकचालक दिनेश चिंतामन दुधुके (वय ३७, रा. वारेगाव, ता. कामठी) व ट्रकमालक वामन भडंग, (रा. बिना, ता. कामठी) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. या रेतीची उचल वामन भडंग याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचेही दिनेशने पाेलिसांना सांगितले. या कारवाईमध्ये एक लाख रुपयांचा ट्रक आणि २० हजार रुपयांची पाच ब्रास रेती असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.