लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : पाेलिसांनी वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रक व रेती असा एकूण २५ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. २२) रात्री करण्यात आली असून, यातील एका आराेपीचा शाेध सुरू असल्याचेही पाेलिसांनी स्पष्ट केले.
वाडी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना वाडी शहराच्या परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांच्या पथकाने एमएच-४०/सीडी-०५९७ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. यात ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाल्याने, पाेलिसांनी ट्रकचालक सिद्धार्थ उमाजी सोमकुवर (३२) व क्लीनर आकाश महेंद्र गजभिये (२४) दाेघेही रा.किरणापूर, ता.सावनेर या दाेघांना अटक केली.
या दाेघांनीही त्या रेतीची वाहतूक ट्रक मालक शुभम पांडुरंग सुपारे (३२, रा.खापा, ता.सावनेर) याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितल्याने पाेलिसांनी त्याच्याही विराेधात गुन्हा नाेंदविला असून, त्याचा शाेध सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये आराेपींकडून २५ लाख रुपयांचा ट्रक आणि २५ हजार रुपयांची पाच ब्रास रेती असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार सुनील मस्के, प्रदीप ढोके यांच्या पथकाने केली.