लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलीस (जुनी) पथकाने कामठी-खापरखेडा मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला. त्यात ट्रकचालकासह दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
ट्रकचालक अर्जुन परसराम गुंडाळे (२९, रा. सावली, ता. पारशिवनी) व क्लिनर दिलीप सुभेलाल उके (४८, रा. चनकापूर, खापरखेडा) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना, कामठी-खापरखेडा मार्गावर एमएच-४०/बीजी-६३८८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेतीची चाेरटी वाहतूक करताना आढळून आले. पाेलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये कन्हान नदी डाेरली (ता. पारशिवनी) रेतीघाटातून विनाराॅयल्टी ४५० फूट रेती भरून वारेगावमार्गे नागपूरकडे वाहतूक केली जात असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. पाेलिसांनी ट्रकचालक व क्लिनर दाेघांना अटक करून त्यांच्याकडून १८ हजार रुपये किमतीचा रेतीसाठा व १५ लाखाचा ट्रक असा एकूण १५ लाख १८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३७९ १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, सहायक पाेलीस उपायुक्त मंगेश पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राहुल शिरे, डीबी पथकाचे राजेश पाली, संजय गीते, प्रशांत सलाम, पवन गजभिये यांच्या पथकाने केली.