कन्हान : पाेलिसांनी गस्तीदरम्यान गाडेघाट (ता. पारशिवनी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे वाहन पकडले. यात वाहन चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण चार लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १७) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कन्हान (ता. पारशिवनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना गाडेघाट शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी त्या भागाची पाहणी केली. यात पाेलिसांनी एमएच-४०/वाय-७६९८ क्रमांकाची मालवाहू बाेलेराे थांबवून झडती घेतली. त्यात रेती असल्याचे तसेच ती रेती विना राॅयल्टी असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनचालक संजय बंडू मेश्राम (३४, रा. जुनी कामठी, ता. पारशिवनी) यास अटक केली. त्याच्याकडून चार लाख रुपयांचे वाहन आणि दाेन हजार रुपयांची रेती असा एकूण चार लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार अरुण सहारे करीत आहेत.