नरखेड : नरखेड पोलिसांनी मोवाड शिवारात कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात ३३ जनावरांची सुटका करण्यात आली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ३० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी पहाटे ४.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली. मोहम्मद उमर बच्चन (३५), अच्चे उमर बच्चन (३६) दोघेही रा. चांदापूर ता. भोगणीपूर जि. कानपूर (उत्तर प्रदेश), सलमान भुरा कुरेशी (२४), मोसिन इदरशी कुरेशी (२०) दोघेही रा. लखणौती, ता, नाखूल जि. सहारनपूर (उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. नरखेड पोलीस गस्तीवर असताना मोवाड शिवारातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी नाकेबंदी करीत यूपी- २१/बी.एन.९०२३ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये पोलिसांना ३३ जनावरे कोंबली असल्याचे आढळून आले. सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशी स्पष्ट झाले. पोलीसांनी ट्रकमधील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत ट्रक जप्त केला. सुटका केलेल्या गुरांना नरखेड येथील गोरक्षणामध्ये ठेवल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय हरीश सरोदे पुढील तपास करीत आहेत.
गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:15 AM