श्याम नाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी २० रुपये किलो असलेली फुलकोबी आता ६० रुपये किलो तर, ४० रुपये किलो असलेली मेथी ८० रुपये किलो झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. नरखेड तालुक्यात एक हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. मेथी, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कारले व काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे ताजा व स्वस्त दरात भाजीपाला बाजारात मिळतो. परंतु गत दोन महिन्यात मागणीपेक्षा आवक कमी, पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम, वाहन खर्चात झालेली वाढ, वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे काही भाजीपाल्याच्या दरात वाढ तर, विशेषतः पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. काहींच्या दरात घसरण झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यापूर्वी असे होते दर
पावसाळ्यापूर्वी पुढीलप्रमाणे प्रति किलो दर होते. मेथी ४० रुपये, पालक १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, गवार ४० रुपये, चवळी भाजी २० रुपये, काकडी ४० रुपये, टमाटर ४० रुपये, कारले ६० रुपये, फुलकोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, वांगी ४०, भेंडी ४० रुपये.
१० ऑगस्टचे दर असे
नरखेडच्या बाजारात मंगळवारी (दि. १०) मेथी ८० रुपये, पालक २० रुपये, कोथिंबीर ८० रुपये, गवार ६० रुपये, चवळी भाजी ४० रुपये, काकडी २० रुपये, टमाटर २० रुपये, कारले ८० रुपये, फुलकोबी ६० रुपये, मिरची ८० रुपये, वांगी ३०, भेंडी ३० रुपये प्रति किलो असा दर होता.
छिंदवाडा येथून आवक
तालुक्यात कोबी, पालक, कोशिंबीर, भेंडी, काकडी, टमाटर, वांगी स्थानिक शेतकऱ्याकडून व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून येते. मिरची अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येते.
--
भाजीबाजारात शेतकरी दलालांना माल देतात. दलालाकडून आम्ही घेतो. बाजारात एखाद्या भाजीची आवक कमी झाली की लिलावात बोली बोलणारे जास्त असतात, त्यामुळे आम्ही चढ्या भावाने खरेदी करतो. त्यावर १०-१५ टक्के वाढवून आम्ही विक्री करतो. पावसाळ्यात पालक, मेथी, कोशिंबीर मोठ्या प्रमाणात खराब होते. ती घट भरून काढण्याकरिता निरुपाय होऊन भाव वाढवावेच लागतात .
चंदू नाडेकर , नरखेड
--
घरी वापराच्या कोणत्याही जिन्नसाचे दर वाढले की गृहिणीचे महिन्याचे बजेट बिघडते. जुळवाजुळव करण्याकरिता तारावरचीच कसरत करावी लागते. किचन मॅनेजमेंट हा गृहिणींना लाभलेला दैवी गुण असल्यामुळे थोडा त्रास होतो, परंतु होऊन जाते.
शालिनी अरसडे, गृहिणी, नरखेड