लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वसननलिकेतील अडथळे किंवा श्वासांवरील नियंत्रण गमावल्याने झोपेत ठराविक अंतराने श्वासोच्छ्वास न करता येणाऱ्या परिस्थितीला ‘स्लीप अॅप्निया’ म्हणतात. यामुळे पुरेशी झोप होत नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात व अनेकदा आपोआप वजन वाढण्याचा त्रास होतो. अलीकडे झालेल्या एका संशोधनात ‘सेक्स’मधील अरुची ‘स्लीप अॅप्निया’चे कारण ठरल्याचे समोर आले आहे. या आजाराच्या १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण अरुचीचे आढळून आल्याची माहितीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी’ व ‘स्लिप मेडिसीन’ विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ऊररोग विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर ‘पल्मो स्लीप मीट’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मेश्राम बोलत होते. यावेळी डॉ. विवेक गुप्ता व डॉ. समीर चौबे उपस्थित होते.डॉ. मेश्राम म्हणाले, ही परिषद प्लमोनरी अल्युमिनाय असोसिएशन, जागतिक स्लीप सोसायटी, असोसिएशन फिजिशियन इंडिया, नॅशनल कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन, इंडियन चेस्ट सोसायटी, विदर्भ चेस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्लीप अॅप्निआ असोसिएशन इंडियाच्या सहकार्याने होत आहे. सात व आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या परिषदेचे आकर्षण स्लीप मेडिसीन या विषयाचे प्रणेती प्रा. नॅन्सी कोलोप (अमेरीका) या आहेत. परिषदेचे आश्रयदाते मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व डॉ. बी. आर. मालघुरे आहेत.
स्लीप अॅप्निआमुळे उच्चरक्तदाब, मधुमेह अनियंत्रितडॉ. मेश्राम म्हणाले, नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिवसातून तीन औषधी घेऊन उच्चरक्तदाब नियंत्रणात राहत नसेल किंवा मधुमेह अनियंत्रित होत असेल तर संबंधित रुग्णाची ‘स्लीप अॅप्निआ’ची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
मुलांच्या घोरण्याकडे दुर्लक्ष नकोबालरोगच्या बाह्यरुग्ण विभागात करण्यात आलेल्या एका अभ्यासात ६० लहान मुलांमध्ये २० टक्के मुले घोरत असल्याचे आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये ‘स्लीप अॅप्निआ’ आढळून आला. मुले जर घोरत असतील तर त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. लहान मुलांच्या घोरण्याला गांभीर्याने घ्या, असा सल्लाही डॉ. मेश्राम यांनी दिला.
खूप जास्त अॅक्टिव्ह मुलांमध्येही हा आजारडॉ. विवेक गुप्ता म्हणाले, ज्यांचा जबडा आत गेलेला असतो किंवा जी मुले खूप जास्त ‘अॅक्टिव्ह’ असतात त्यांच्यामध्ये ‘स्लीप अॅप्निआ’ आढळून येतो.