नागपूर : शहराची ओळख असलेल्या एका एका वारसास्थळाचे अस्तित्व कधी अतिक्रमणामुळे तर कधी विकासाच्या नावाने धाेक्यात येत आहे. त्यात आता वैभवपूर्ण अंबाझरी उद्यानाचाही समावेश हाेताे की काय, ही भीती निर्माण झाली आहे. हाेय, कारण विकासाच्या नावाने जमिनीवर डाेळा ठेवणाऱ्या पर्यावरणशत्रूची वक्रदृष्टी या वैभवावर पडली आहे. त्यामुळे नागपूरकरांनाे सावधान, अंबाझरी उद्यानाचे वैभवही आता संकटात येईल, अशी संतप्त भावना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
भाेसले काळात किंवा गाेंड काळात तयार झालेल्या अनेक वारसा स्थळांपैकी अंबाझरी उद्यान हेही एक आहे. साधारणत: १८७० मध्ये त्याची निर्मिती झाली व १९५० च्या दशकात त्याची जबाबदारी महापालिकेकडे आली. महापालिका किंवा काेणत्याही यंत्रणेला अशा एकाही वैभवपूर्ण स्थळाची निर्मिती करता आली नाही. त्यामुळे किमान अस्तित्वात असलेल्या वारसांना जाेपासण्याची जबाबदारी तरी प्रामाणिकपणे पाळावी, अशी अपेक्षा असते. मात्र शहरातील यंत्रणा ही जबाबदारीही निभावत नसल्याची खंत पर्यावरणवाद्यांना आहे.
उद्यानातील बांधकामावर प्रश्नचिन्ह
ट्री ॲक्ट १९७५ च्या २०१६ साली झालेल्या सुधारणेनुसार उद्यानात कमर्शियल ॲक्टिव्हीटी करणे बेकायदेशीर आहे. कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र अंबाझरी उद्यानात रिसाॅर्टचे काम सुरुच आहे. गेल्या वर्षी लाॅकडाऊनपासून उद्यान लाेकांसाठी बंद करण्यात आले, तेव्हापासून ते उघडले गेले नाही. माॅर्निंग वाॅकर्सना फिरण्यासही मनाई करण्यात आली. बाहेरून टिन लावण्यात आले. त्यामुळे आंतमध्ये सुरू असलेल्या बांधकामावर संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील सर्व उद्याने मनपा व नासुप्रच्या नियंत्रणात आहेत. मात्र सूत्राच्या माहितीनुसार अंबाझरी उद्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे साेपविण्यात आले व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील हिरवळीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेची ‘ट्री कमिटी’ आहे. त्यात मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेत नगरसेवक आणि एनजीओचा समावेश आहे. मात्र माेठ्या प्रमाणात वृक्षताेड हाेत असताना ही कमिटी काय करते, हा प्रश्न आहे. शहरात कुठे ना कुठे बेकायदेशीर वृक्षताेड चालली असते पण यंत्रणा डाेळेझाक करीत आहे. अंबाझरी उद्यानातही तेच हाेत आहे.
- अनसूया काळे-छाबरानी, पर्यावरण कार्यकर्ता
नागरिकांच्या प्रतिक्रिया
गेल्या २५ वर्षापासून या उद्यानात फिरायला येताे पण असे कधी झाले नाही. उद्यानातील शेकडाे झाडे आम्ही नागरिकांनी लावली व जगवली आहेत. आता ही झाडे ताेडली जात आहेत. उद्यानाचा सत्यानाश करण्याचा प्रकार चाललेला आहे.
- बबन माेहड ()
विद्यापीठ परिसराजवळ आंबेडकर सभागृहापासून असंख्य झाडे ताेडण्यात आली आहेत. आम्ही लावलेली व नैसर्गिक वाढलेली ५०० च्यावर जवळपास झाडे बेकायदा ताेडण्यात आली आहेत. हा प्रकार संतापजनक आहे.
- प्रदीप काेल्हे ()
काेराेना महामारीमध्ये ऑक्सिजनअभावी अनेकांचे जीव गेले तरीही नि:शुल्क ऑक्सिजन देणाऱ्या असंख्य झाडांना कापले जात आहे. अंबाझरी उद्यानात हा बेकायदेशीर प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
- डाॅ. अभय सिन्हा ()
उद्यानाच्या बाहेरची झाडे ताेडली जात आहेत. आतमध्ये फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. कुणाला जाऊ दिले जात नाही आहे. दिसू नये म्हणून टिनाच्या पत्र्यांनी झाकण्यात आले आहे. काहीतरी काळेबेरे चालले असल्याचा संशय येताे आहे.
- मनीष दुरुगकर ()