मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस नेत्यांचा सावध पवित्रा
By कमलेश वानखेडे | Published: September 23, 2024 03:06 PM2024-09-23T15:06:17+5:302024-09-23T15:08:21+5:30
Nagpur : चेन्नीथला, पटोले, थोरात म्हणाले निवडणुकीनंतर ठरेल
नागपूर : महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा घेतला आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होतील, असा दावा केला असताना महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, गटनेते बाळासाहेब थोरात व स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणुकीनंतर याबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे.
रविवारी नागपुरातील आढावा बैठकीत माजी मंत्री अनीस अहमद, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार आदींनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी सकाळी नागपुरात बोलताना निवडणुकीनंतर याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले. गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही हीच लाईन कायम ठेवली. आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून घेऊ. तो योग्य वेळी घेऊ. उत्साही कार्यकर्ते असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे येत असतात. त्यावर लक्ष देण्याची गरज नाही, असे थोरात म्हणाले. तर नाना पटोले यांनीही यावर निवडणुकी नंतरच महाविकास आघाडीमध्ये बसून निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. मी जर तर वर विश्वास ठेवत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी तरुण यांच प्रश्न महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातून जास्त जागा आल्यास पटोलेच मुख्यमंत्री : आ. विकास ठाकरे
विदर्भातून काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साकडे घालू. विदर्भातील नेतृत्वाला संधी देण्याची मागणी करू. नानाभाऊंसाठी मुख्यमंत्रीपद खेचून आणू, असे आ. विकास ठाकरे म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातील किंवा भागातील माणूस मुख्यमंत्री व्हावा. नाना पटोले विदर्भाचे नेते आहे. त्यांची मेहनत आहे. विदर्भातून काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच असेल. काँग्रेसमध्ये सर्वच सक्षम नेते आहे. या स्पर्धेत विदर्भातील जनतेने जास्त जागा दिल्या तर विदर्भातील जनतेचा हक्क पहिला असेल. विदर्भ नंबर वन असला तर यावर हायकमांड सुद्धा न्याय करेल, असा विश्वासही आ. ठाकरे यांनी व्यक्त केला.