निशांत वानखेडे
नागपूर : लाखाे वर्षांपूर्वी मानव आजच्यासारखा बुद्धिमान (हाेमाे सेपियन) नव्हता. प्राण्यांची शिकार करायचा, कंदमुळे खायचा, गुहेत राहायचा. ताे कसा जगत असेल याचे कुतूहल आपल्या मनात येते. मात्र या पाषाणयुगीन मानवाने त्याच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा गुहांमध्ये माेठमाेठ्या पाषाणांवर कलाकृतींच्या माध्यमातून काेरून ठेवल्या आहेत. विदर्भातही अशा कातळ शिल्प व गुहाचित्रांचा वारसा येथील प्रागैतिहासिक मानवाचे अस्तित्व दर्शविताे.
१८ व्या शतकाच्या मध्यपासून भारतातील गुहाचित्र, खडकचित्रांवरील संशाेधन सुरू झाले. मात्र हे संशाेधन उत्तर व दक्षिण भारतापुरते मर्यादित हाेते. पुढे १९५७ मध्ये मध्य प्रदेशातील ‘भीमबेटका’ या स्थळाचा शाेध लागला आणि जगातील पुरातत्त्व संशाेधकांचे लक्ष मध्य भारताकडे वळले. यातही विदर्भ उपेक्षित राहिला हाेता. अलीकडच्या काळात विदर्भातील इतिहासपूर्व काळातील वारसास्थळांचा इतिहास प्रकाशात येऊ लागला आहे. नागपूरचे पुरातत्त्व अभ्यासक डाॅ. आकाश गेडाम यांनी विदर्भातील गुहाचित्रे व कातळशिल्पांवर भरीव काम केले. यातील एकाएका स्थळाची प्रागैतिहासिक ते इतिहासकाळापर्यंतच्या मानवी अस्तित्वाचे महत्त्व सांगणारी नाेंद त्यांनी घेतली आहे.
चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांतील गुहाचित्रे
- राॅक आर्टमध्ये विशेषत : गडद लाल, तपकिरी, गेरू रंगाची चित्रकारिता, खाेदकाम, काेरीव शिल्पकला पाहावयास मिळते. माेठे पाषाण किंवा खडकाच्या पृष्ठभागावरची चित्रकारिता लक्ष वेधणारी आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यात शंकरपूरहून दक्षिणेकडे १०५ कि.मी.वर नागरगाेटा व पांडुबरा या भागांतील वाघाई टेकडीच्या गुहांमध्ये मानवी आकृत्या, जंगली व पाळीव प्राण्यांची चित्रे, भाैगाेलिक आकृत्या बघावयास मिळतात.
- ठिपके, छिद्र, शंकूच्या आकाराचे कपचिन्ह, पायांचे ठसे तयार केलेले दिसतात.
- पारसगढ-नागभीडदरम्यान डाेंगराच्या पायथ्याशी नवतळा येथे २० ते २५ गुहांपैकी ४-५ गुहांमध्ये चित्रे आहेत.
- अमरावतीवरून ८५ कि.मी. दूर सातपुडा पर्वतरांगांच्या नैसर्गिक गुहेत वाघ, हत्ती, जिराफासह अनेक प्राण्यांची गुहाचित्रे बघावयास मिळतात.
- साेबत असलेल्या तरुणांना शिकारी प्राणी, धाेकादायक प्राणी यांची ओळख व्हावी यासाठी ही चित्रे काढल्याचे लक्षात येते. या भागात जिराफांचे अस्तित्व हाेते, हेही यातून दिसून येते.
- भंडारा जिल्ह्यात बावनथडी प्रकल्पाजवळ सँडस्टाेनवर लाल-पांढऱ्या रंगांमध्ये मानवचित्रे व भाैमितिक आकृत्या काेरल्या आहेत.
- गाेंदिया जिल्ह्यात बाेदलकसा तलावाजवळ माेठ्या खडकाच्या कॅन्व्हासवर पुरातन मानवाने काढलेली चित्रे आढळतात.
- अलीकडे २०१२-१३ मध्ये गाेविलगड ते सालबर्डीदरम्यान २४७ गुहा शाेधण्यात आल्या, ज्यांतील १०० च्या वर गुहांमध्ये खडकचित्रे व गुहाचित्रे आढळून आली आहेत. यात समूहाने राहून गुरे पालन करणाऱ्या मानवी काळाचे दर्शन घडले आहे.
नागपूर, भंडारा, गाेंदियातही समृद्ध वारसा
- नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यातील पुल्लरजवळ उखळगाेटा येथे माेठ्या खडकावर प्राण्यांसह जुन्या खेळांची चित्रे आहेत.
- याच भागात भिवकुंड येथे पाच लेण्यांच्या समूहात काही लेण्यांमध्ये खडकचित्रांमध्ये समूहात राहणाऱ्या मानवाचे दर्शन घडते. या परिसरात माेठ्या प्रमाणात कातळशिल्पे व गुहाचित्रे आहेत.
मानवी अस्तित्व व उत्क्रांती हा कायम संशाेधनाचा विषय आहे. विदर्भातील या गुहाचित्र व खडकचित्रांमध्ये पूर्वपुरापाषाण काळापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतच्या मानवाचे संदर्भ आढळतात. त्यामुळे या वारशाचे जतन करून सखाेल अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.
- डाॅ. आकाश गेडाम, पुरातत्त्व वारसा तज्ज्ञ