लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल भागात असलेल्या देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, हे सेंटर नेमके कुठे सुरू करायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, आठवडाभरापासून जागेचा शाेध सुरू आहे.
हा संपूर्ण परिसर आदिवासीबहुल असल्याने तसेच येथील काेराेना रुग्णांना नागपूर अथवा अन्य शहरांतील शासकीय रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने व खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली हाेती. यासंदर्भात ‘लाेकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला आणि प्रशासनाने त्याची दखल घेत देवलापार येथील काेविड केअर सेंटरला मंजुरी दिली.
मंजुरी प्राप्त हाेताच सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला. या सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयूची व्यवस्था केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. वास्तवात, हे सेंटर अद्यापही सुरू करण्यात आले नाही. मात्र, राजकीय श्रेय घेण्यासाठी काही नेत्यांनी हा उपद्व्याप केल्याचा आराेप काही नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, या सुविधा कायमस्वरूपी राहणार असल्याने या सेंटरसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालय याेग्य असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. काहींनी हे सेंटर कट्टा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. श्रेय घेण्याच्या शर्यतीमुळे हे सेंटर सुरू हाेण्यास विलंब हाेत असल्याचा आराेपही सुज्ञ नागरिकांनी केला आहे.