लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण वाढत असून, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पंचाळा (बु.) येथे दाेघांचा मृत्यू झाला. काेराेना रुग्ण व मृतांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांच्यावर याेग्य उपचार करण्यासाठी काेविड सेंटरची नितांत आवश्यकता आहे. मात्र, या सेंटरसाठी याेग्य जागा मिळत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने काेविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ते कुठे व कसे सुरू करावे, त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता कशी करता येईल, याबाबतचा संभ्रम कायम आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२४) एकूण ४० नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली, साेबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. तालुक्यात आजवर एकूण ५१ काेराेना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात दुसऱ्या टप्प्यातील सहा आणि पंचाळा (बु.) येथील दाेन रुग्णांचा समावेश असून, त्या दाेन्ही रुग्णांचा एकाच आठवड्यात अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने मृत्यू झाला.
सध्या काेराेना रुग्णांचा भरती करण्यापूर्वीच मृत्यू हाेत आहे. पहिल्या टप्प्यात किट्स कॉलेजजवळ काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले हाेते, नंतर ते बंद करण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणी किमान एक काेविड केअर सेंटर असेल तर रुग्णांवर वेळीच उपचार व त्यांना ऑक्सिजन उपलब्ध हाेऊ शकताे. त्यामुळे जीव गमावण्याची शक्यता कमी असते. उपचाराची साेय नसल्याने रुग्णांना भरती व उपचारासाठी नागपूरला पाठविले जाते. रामटेक-नागपूर दाेन तासाचा प्रवास असून, प्रवासात उपचाराअभावी रुग्णाच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामटेक परिसरातील अंबाळा वळण रस्त्यावर पर्यटन निरीक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. त्या केंद्राच्या इमारतीत खाटा व कर्मचाऱ्यांची साेय केल्यास काेविड उपचार केंद्र सुरू करता येऊ शकते, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
नागपुरात खाटांची कमतरता
सध्या नागपूर शहरात काेराेना रुग्णांसाठी राखीव केलेल्या खाटांची संख्या कमी पडत आहे. शहरातील काेविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध नसल्यास रुग्णाला वेळेवर दुसऱ्या सेंटरमध्ये हलवावे लागते. त्यात वेळ खर्च हाेताे. ही साेय रामटेक शहरात केल्यास नागपूर शहरातील काेविड सेंटरवरील भार कमी हाेऊ शकताे. दुसरीकडे शहरात काेविड उपचार केंद्रासाठी याेग्य जागा उपलब्ध हाेत नाही. इतर आजाराचे रुग्ण विचारात घेता, ते उपजिल्हा रुग्णालयात सुरू करणे शक्य नाही. शिवाय, शहर व तालुक्यातील आराेग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अडचणी येत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उजगरे यांनी दिली.