लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली हाेती. ती आटाेक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. परिणामी, काेराेना रुग्णसंख्येत बरीच घट आल्याचे दिसून येते. दरम्यान, बुधवारी शहरात तहसील कार्यालय, पाेलीस, न.प. प्रशासन व आराेग्य विभागाने संयुक्त कारवाई करीत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली.
शहरातील गांधी चाैक, जयस्तंभ चाैक या ठिकाणी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी केली गेली. गांधी चाैकात ११५ तरुणांची तपासणी करण्यात आली. यापैकी एक पाॅझिटिव्ह आढळून आला, तसेच जयस्तंभ चाैकात ४८ तरुणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कुणीही पाॅझिटिव्ह आढळला नाही. या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा घालता आला. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे, ठाणेदार मारुती मुळूक, डाॅ.संदीप गुजर उपस्थित हाेते. ही कारवाई नियमित हाेणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आरएचटीसी येथे १५० चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यात आठ जण पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे सांगण्यात आले.