पारशिवनी : ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे शासनाचे निर्देश असतानाही काही बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसून येतात. अशा रिकामटेकड्यांची ऑन दि स्पाॅट काेविड चाचणी केली जात आहे.
काही नागरिक लक्षणे असतानाही काेविड चाचणी करीत नाही. घरीच औषधाेपचार करून बाहेर खुलेआम वावरतात. यामुळे त्यांच्यापासून इतरांना धाेका हाेऊ शकताे. यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ऑन दि स्पाॅट काेविड चाचणी माेहीम पाेलिसामार्फत राबविली जात आहे. यात पारशिवनी ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत व तहसील कार्यालयाची चमू सहकार्य करीत आहेत. या माेहिमेंतर्गत मंगळवारी ५४ जणांची रॅपिट ॲंटिजेन टेस्ट करण्यात आली तर बुधवारी ८१ नागरिकांची काेविड चाचणी केली गेली. यात कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आले नाही.
या माेहिमेमुळे शहर व परिसरात पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी हाेत असल्याचे निदर्शनात आले. शिवाय विनाकारण फिरणाऱ्यांवर ब्रेक लागला आहे. सध्या ही माेहीम शहरातील मुख्य चाैकात सुरू असून, पादचारी व दुचाकीस्वारांची काेविड चाचणी हाेत आहे. याठिकाणी पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे यांच्यासह पाेलीस कर्मचारी तैनात आहेत. तसेच मुख्याधिकारी अर्चना वंजारी व नगर पंचायत चमू यांच्या उपस्थितीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तहसीलदार वरूनकुमार सहारे माेहिमेच्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.