क्षयरोगाचे तत्काळ होणार निदान : एआरटी सेंटरवरील एचआयव्ही बाधितांना मिळणार लाभनागपूर : एचआयव्ही बाधिताला क्षयरोगाची लागण अतिशय लवकर होते. अशातच एचआयव्ही रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे क्षयरोगाची लागण झाल्यानंतर एचआयव्ही बाधित व्यक्ती दगावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. क्षयरोग झाल्याचे निदान तत्काळ होण्यासाठी मेडिकलच्या एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन केंद्रावर (एआरटी) ‘सीबीनेट’ नावाची मशीन बसविण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सेवेकडून ही मशीन येत्या सोमवारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.पूर्वी क्षयरोगाचे निदान एक्स-रे व इतर साधनांच्या माध्यमातून केले जात होते. मात्र याला किमान दोन महिन्याचा कालावधी लागायचा. यातही ५० टक्केच रुग्णांचे निदान व्हायचे. या शिवाय बहुविध औषध प्रतिरोधक क्षयरोग (एमडीआर टीबी) तपासणीत आढळूनही येत नव्हता. परंतु आता ‘सीबी नेट या मशीनद्वारे केवळ दोन तासातच त्यातही आजाराचे १०० टक्के निदान करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, शरीराच्या इतरही अवयवात असलेल्या क्षयरोगाचेही निदानही ही मशीन करते. सध्या नागपुरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) तर दुसरी मशीन टीबी सेंटर येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोमवारी मेडिकलच्या एआरटी सेंटरवर या मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सेवेकडून ही मशीन उपलब्ध झाली होणार आहे. या संदर्भातील आवश्यक मंजुरीसाठी सोमवारी राज्य क्षयरोग कार्यक्रमाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नदीम खान यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांंना मंजुरीचे पत्र दिले. डॉ. निसवाडे यांनी तत्काळ मशीनसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देत मंजुरी दिली. यावेळी क्षय व छातीरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. घोरपडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ उपस्थित होते. विशेष म्हणजे, या मशीनला लागणारे तंत्रज्ञ, आवश्यक साहित्य एवढेच नव्हे तर वातानुकूलित यंत्रही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहे. (प्रतिनिधी)
मेडिकलमध्ये लागणार ‘सीबी नेट’ मशीन
By admin | Published: January 15, 2016 3:39 AM