नागपूर : सीबीआयने (CBI) आज (दि. १२) सकाळी सात वाजतापासून शहरातील १२ ठिकाणी छापेमारी करून सर्च ऑपरेशन सुरू केले. ही १२ ठिकाण म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित सीएचे कार्यालय आणि निवास असल्याचे कळते.
आज सकाळी ७ वाजतापासून कोराडी परिसरासह विविध भागात हे छापे टाकण्यात आले. सुत्रांनुसार, देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ७ कोटींचा व्यवहार झाला होता. त्यासंबंधाने ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येते. आधी हा व्यवहार ४ कोटींचा असल्याची चर्चा होती. तर, आता ती रोकड सात कोटी असल्याची माहिती पुढे आल्यामुळे ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित वर्तुळात खळबळ उडाली असून शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालकांकडून १०० कोटींची खंडणी वसूल करण्याचा आरोप झाल्याने प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्याचा मुद्द्यावर गदारोळ उठला होता. अँटिलिया स्फोटक प्रकरण, वसुली आणि बदल्याच्या वादळात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही पदावरून जावे लागले. दरम्यान देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना कारागृहात जावे लागले. त्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे सुरुच आहे.
दोन वाहनातून धडकली सीबीआय टीम
दोन वाहनांनी सीबीआयची टीम कोराडी मार्गावरील लॅवरेज ग्रीन सोसायटीमध्ये देशमुखांचे सीए विशाल खटवानी याच्या निवास तसेच कार्यालयात धडकली. तेथे त्यांनी कागदपत्रांची तपासणी करून काही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेतली. तपासणीत काही डिजिटल पुरावेही सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. सकाळी ७ वाजतापासून ही कारवाई सुरू होती. सीए खटवाणी शेअर ट्रेडींगशीही संबंधित असल्याची चर्चा आहे.