लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १८४ कोटी रुपयाचे कर्ज बुडविल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) शहरातील उद्योजक आयुष लोहिया यांच्या घरावर धाड टाकून दस्तावेज जप्त केले. आयुष लोहिया कोलकाता येथील रामस्वरुप इंडस्ट्रीज लि.चे संचालक आहेत. या कंपनीत लोहिया यांच्या व्यतिरिक्त नवीन गुप्ता, ललित मोहन, बिमल झुनझुनवाला हे सुद्धा संचालक आहेत. रामस्वरुप इंडस्ट्रीज लि.ने कोलकाता येथील युनियन बँक आॅफ इंडिया येथून १८४ कोटी ४३ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या या रकमेपैकी १३० कोटी ९५ लाख रुपये कोलकाता येथील एका दुसऱ्या कंपनीच्या खात्यात स्थानांतरित केले. यानंतर युनियन बँक आॅफ इंडियाला सुद्धा कर्जाचे मासिक हप्ते भरले नाहीत. यानंतर कोलकातातील सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. कोलकातातील सीबीआयने आरोपींच्या विरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी षड्यंत्राचा गुन्हा दाखल केला. कोलकाता सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्देशानंतर बुधवारी कोलकाता, जमशेदपूर, नागपूरसह अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. लोहिया हे शिवाजीनगर येथील पॅरामाऊंट हाई्टस येथे राहतात. सीबीआयच्या नागपूर शाखेने बुधवारी सकाळी लोहियाच्या घरी धाड टाकली. त्यांनी लोहियाच्या घरातून प्रकरणाशी संबंधित दस्तवेज जप्त केले. या कारवाईमुळे नागपुरातील उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. लोहिया हे लोखंड उद्योजक आहेत. सीबीआय येथील जप्त केलेले दस्तावेज कोलकाताला पाठवणार आहे. ही कारवाई सीबीआयचे अधीक्षक एस.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उद्योजक आयुष लोहियावर सीबीआयची धाड
By admin | Published: June 15, 2017 2:07 AM