लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीमध्ये आर्या दाऊ हिने ९९.४० टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल तर, देशात तृतीय स्थान पटकावले. ती भारतीय कृष्ण विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. याशिवाय विदर्भामध्ये सेंटर पॉईंट स्कूल अमरावती बायपास शाखेच्या राघवी शुक्लाने ९९ टक्के गुणांसह द्वितीय तर, भवन्स बी. पी. विद्या मंदिर श्रीकृष्णनगरचा चिराज कुबडे व नारायणा विद्यालय वर्धा रोडची आयशानी प्रभू यांनी प्रत्येकी ९८.८० गुण प्राप्त करून संयुक्तपणे तृतीय स्थानावर नाव कोरले.सीबीएसईने इयत्ता बारावीप्रमाणे इयत्ता दहावीचा निकालही अचानक जाहीर केला. निकालाची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. अशातच सोमवारी दुपारी ३ वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. परंतु, सीबीएसईने दुपारी २.३० वाजताच निकाल जाहीर केला. एकंदरीत निकालावर लक्ष टाकल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकेक गुणासाठी स्पर्धा दिसून येते. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील विद्यार्थिनींनी नेहमीप्रमाणे यावेळीही वर्चस्व कायम ठेवले. असे असले तरी, विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनात गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडी सुधारणा झाली. तसेच, अनेक शाळांच्या कामगिरीतही प्रगती झाली व गुणवंतांची संख्या वाढली. त्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.