२७ ला होणार परीक्षा : कठोर नियमांमुळे विद्यार्थी हैराण नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (युजीसी-नेट) पेपर फुटण्याची शंका अस्वस्थ करू लागली आहे. यामुळेच येत्या २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसंबंधी अधिक सतर्कता बाळगली जात आहे. परंतु सीबीएससीची ही सतर्कता विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरत आहे. माहिती सूत्रानुसार सीबीएसईला मागील काही दिवसांपूर्वी यासंबंधी माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या अखिल भारतीय पूर्व-वैद्यकीय चाचणी परीक्षा (एआयपीएमटी) साठी निश्चित केलेले अनेक नियम आता ‘नेट’ परीक्षेसाठी सुद्धा लागू करण्यात आले आहेत. सीबीएसईने सर्वप्रथम डिसेंबर २०१४ मध्ये युजीसी-नेटचे आयोजन केले होते. यानंतर जून २०१५ मध्ये सुद्धा युजीसी-नेट घेण्यात आली. परंतु तोपर्यंत अशा जाचक अटी-शर्ती नव्हत्या. मात्र आता परीक्षार्र्थींसाठी अनेक कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. जाणकारांच्या मते, या परीक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील नेट सेल व कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.(प्रतिनिधी) प्रश्नावर चर्चा नाही सीबीएसईच्या नवीन नियमांनुसार परीक्षार्र्थींना परीक्षेदरम्यान प्रश्नावर कोणतीही चर्चा करता येणार नाही. एवढेच नव्हे, तर एखाद्या विद्यार्थ्यांकडे कॉपी अथवा मोबाईल फोन सापडल्यास त्याच्याविरुद्ध सुद्धा कठोर कारवाई केली जाईल. शिवाय त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार नाही. परीक्षार्थींची होणार चौकशी नवीन नियमानुसार परिक्षार्र्थींची परीक्षा केंद्रावर कसून चौकशी केली जाईल. त्यांना परीक्षा केंद्रावर पेन, पेन्सिल वा मोबाईल फोन नेण्याची परवानगी राहणार नाही. सोबतच घड्याळ, अंगठी, चेन, लॉकेट, ब्रेसलेट,पर्स किंवा बॅग सुद्धा नेता येणार नाही. परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या आत पेन दिला जाईल.
सीबीएसईला ‘नेट’चा पेपर फुटण्याची शंका!
By admin | Published: December 26, 2015 3:40 AM