लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसईतर्फे विशेष सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असल्याचे चित्र आहे. सीबीएसईतर्फे परीक्षा घेण्यात आली नसली तरी ३०:३०:४० च्या सूत्रानुसार मिळालेल्या गुणांत विद्यार्थिनीच आघाडीवर आहेत. कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाच्या वर्षाला सामोर गेलेल्या विद्यार्थी व पालकांमध्ये निकाल लांबल्याने धाकधूक निर्माण झाली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात काही जणांनी अपेक्षित गुण मिळाल्याची भावना व्यक्त केली.
कोरोनामुळे यावर्षी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीएसईने ३०:३०:४० या सूत्राचा वापर केला होता. बारावीच्या वर्षात शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रथम सत्र परीक्षा यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला. या सूत्रात दहावी व अकरावीतील गुणांचादेखील विचार करण्यात आला.
विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याचा निकाल ९९.३० ते ९९.४० टक्के इतका लागला. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या निकालात ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात आहे. यातही मुलींची संख्या जास्त आहे. ९५ टक्के ते ९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्यांमध्येदेखील विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यातून सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुण
दरवर्षी निकालांत विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण असतात. परंतु, यावर्षी मानव्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुणांची टक्केवारी ९९.२० टक्के इतकी आहे. विज्ञान शाखेत ९८.६०, तर वाणिज्यमध्ये ९८.८ टक्के ही सर्वाधिक टक्केवारी आहे.
‘सेलिब्रेशन’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच उत्साह
कोरोनाच्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांचे बहुतांश वर्ग ऑनलाईनच झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शाळांमध्ये येतील अशी शिक्षकांनादेखील अपेक्षा नव्हती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी शाळांकडे धाव घेतली व निकालाचे ‘सेलिब्रेशन’ केले. यातदेखील विद्यार्थिनींचाच जास्त उत्साह दिसून आला.
निकालामुळे काहींचा अपेक्षाभंग
यंदा निकाल जाहीर करण्याचे सूत्रच बदलल्याने अनेकांच्या निकालावर परिणाम झाला आहे. वर्षभर खूप मेहनत करूनदेखील अनेकांना कमी गुण मिळाले आहे. अपेक्षेपेक्षा चार ते पाच टक्के कमी गुण मिळाले असून, सीबीएसईच्या सूत्रामुळे हा फटका बसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
अनेक शाळांचा निकाल ‘सेंट परसेंट’
यंदा विशेष सूत्रानुसार निकाल जाहीर झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परंतु, काही शाळांमधील विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून आले.