मनपा आयुक्तांचे आदेश जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता, शहरातील हॉटेल्स, लॉन, शाळा यासह विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात आले आहे. मनपाने या केंद्रांना मंजुरी दिली आहे. कोरोनाची लक्षणे नसलेले वा कमी लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी सीसीसी फायद्याचे ठरत आहे. दरम्यान, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोविड केअर सेंटर संदर्भात आवश्यक दिशा-निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर ऑक्सिजन, वैद्यकीय सुविधांसोबतच अनुभवी डॉक्टर, परिचारिका व पॅरामेडिकल स्टॉफ असणे आवश्यक असून, शुल्क निर्धारित केले आहे.
याठिकाणी रूग्णांची देखभाल व्हावी, बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था असावी. तसेच २४ तास डॉक्टरांचा सल्ला मिळण्याची सुविधा असली पाहिजे. सीसीसी जास्तीत जास्त ४ हजार शुल्क आकारू शकतात. यात नियमित तपासणी, ऑक्सिजन चार्जर, बेड शुल्क, जेवण आदी व्यवस्थांचा समावेश आहे.
सीसीसी केंद्रावर सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करावे लागेल. सुविधा हवी असल्यास त्यासंदर्भात रूग्णांना माहिती द्यावी लागेल. त्यांची अनुमती असेल तरच जादा शुल्क आकारता येईल.