नागपूर : आमदार निवासातील कोविड केअर सेंटर शुक्रवारी सुरू होऊ शकले नाही. सेंटरमध्ये अजूनही आवश्यक साधने, औषधे पोहचली नाही. पण सेंटरसाठी नोडल अधिकारी, डॉक्टर व मेडिकल स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार निवासात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी काही साधने व सुविधांची गरज आहे. सूत्रांनी सांगितले की नोडल अधिकारी म्हणून डॉ. नितीन गुल्हाने यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश झाल्यानंतर सायंकाळी आमदार निवासात पोहचून त्यांनी स्वच्छता व सॅनिटायझेशन करवून घेतले. मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आवश्यक साहित्याची यादी दिली. ११ मार्च रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना आमदार निवासात सीसीसी सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला ६ दिवसाचा वेळ लागला. यासंदर्भात महापालिका व जिल्हा परिषदेशी संबंधित अधिकाऱ्यांशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही.