लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये राहण्याची सुविधा नाही. अशा कोरोनाबाधितांना शहरातील कोविड केअर सेंटर(सीसीसी)मध्ये ठेवले जात आहे. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विचार करता सीसीसी केंद्रात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या पाचपावली, व्हीएनआयटी, आमदार निवास आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास सिम्बॉयसिस व वनामती येथे पुन्हा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
मागील वर्षी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मनपा प्रशासनाने संबंधित विभागातील प्रमुखांशी संपर्क साधत वसतिगृहे ताब्यात घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विधि महाविद्यालय वसतिगृह (लोअर होस्टेल) आणि गांधीनगर येथील मुलींचे वसतिगृह, कृषी महाविद्यालयातील मुले आणि मुलींची चार वसतिगृहे, राजनगर येथील पीडब्ल्यूएस क्वाॅर्टर, सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या मुलींचे वसतिगृह, अजनी येथील नवीन पोलीस क्वॉर्टर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वसतिगृह, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाचे दोन वसतिगृह, दक्षिण अंबाझरी मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वसतिगृह, गणेशपेठ येथील रॉय उद्योग वसतिगृह, काटोल मार्गावरील रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन्ही वसतिगृह तर दिघोरी आऊटर रिंग रोडवरील छत्तरपूर फार्म आदींचा समावेश होता.
....
मनुष्यबळाची गरज
पाचपावली व व्हीएनआयटी कोविड केअर सेंटर येथे ३५० खाटा आहेत. आमदार निवास येथील केंद्र सुरू झाल्याने पुन्हा ३०० खाटा उपलब्ध झाल्या आहेत. पुन्हा नवीन केंद्र सुरू करावयाचे झाल्यास यासाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मनपाला उपलब्ध करावे लागतील. या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.