नागपूर : गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवणारे आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणारे सीसीटीव्ही कॅमेरे आता विविध रेल्वेगाड्यांतही लागणार आहेत. यामुळे धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसेल आणि प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तूंचे रक्षण होईल अशी अपेक्षा आहे.
किफायतशीर आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसोबतच मोठमोठे व्यापारीही माैल्यवान चिजवस्तू घेऊन रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करतात. त्यांच्यावर नजर ठेवून असलेले भामटे संधी मिळताच त्यांचे साहित्य लांबवितात. हा नेहमीचाच प्रकार आहे. शिवाय छोटे-मोठे चोरटेही रेल्वेगाड्यांमध्ये सक्रिय असतात. त्यामुळे अलीकडे विविध मार्गांवर धावणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घटना घडल्यानंतर संबंधित व्यक्ती रेल्वे पोलिसांकडे तक्रार करतो. मात्र, अशा घटनांचा छडा लावून आरोपींना पकडणे पोलिसांसाठी जिकरीचे काम ठरते. त्यामुळे धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या चोरीच्या अनेक घटनांचा छडाच लागत नाही. याउलट रेल्वेस्थानकावर किंवा परिसरात झालेल्या चोरीचा अनेकदा रेल्वे पोलिस २४ तासातच छडा लावतात आणि चोरट्यांना अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करतात. कारण रेल्वेस्थानक आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागून असतात आणि तेच चोरीच्या किंवा अन्य गुन्ह्यांचा छडा लावण्यास पोलिसांना मदत करतात. त्यामुळे आता यापुढे रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये कॅमेरे लावण्याचे नियोजन आहे.
नव्या कोचमध्ये सुरुवात
विशेष म्हणजे, काही विशिष्ट कालावधीनंतर प्रत्येक गाडीचे कोणते ना कोणते कोच बदलवले जाऊन नवीन कोच लावले जातात. यापुढे जे कोणते कोच बदलवले जातील त्या सर्व नवीन कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत रेल्वेत असणाऱ्या गुन्हेगारांवर नजर असेल आणि त्याचमुळे चोऱ्या तसेच अन्य प्रकारच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यास मदत होईल.
या गाड्यांमध्ये लागले कॅमेरे
अलीकडेच दुरंतो एक्स्प्रेसमध्ये चार नवीन कोच लावण्यात आले. त्यात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नागपूर मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेससह अन्य काही गाड्यांमध्ये एकूण ५४ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याने कैद केलेल्या घडामोडींचा डाटा आरपीएफजवळ राहणार आहे.
-----