हायकोर्ट स्वत: तपासणार सीसीटीव्ही फुटेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:19 AM2018-08-04T01:19:27+5:302018-08-04T01:20:37+5:30
कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत: तपासण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनी यांना सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने शुक्रवारी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत: तपासण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनी यांना सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.
यासंदर्भात किशोर सोनवणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने वेगवेगळ्या तारखांना न्यायालयात दोन प्रतिज्ञापत्र सादर करून चाचणीत ‘मास चिटिंग’ झाली नसल्याचा दावा केला तसेच, याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीनेही चाचणी नियमानुसार झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. परंतु, आयुर्वेद संस्थेच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने आयुर्वेद संस्थेला दोन्ही प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचा आदेश देऊन सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. न्यायालयाच्या आदेशामुळे चाचणीचा निकाल स्थगित आहे. प्रकरणावर आता १० आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अनुप ढोरे तर आयुर्वेद संस्थेतर्फे अॅड. उल्हास औरंगाबादकर व अॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.
असे आहे प्रकरण
२४ जून २०१८ रोजी देशातील २० शहरांमध्ये अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश चाचणी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. याचिकाकर्त्यांनी लगेच परीक्षा अधिकाºयांकडे तक्रार केली, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली. परंतु याचिकाकर्त्यांचे कुणीच ऐकले नाही.