लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. होम आयसोलेशनमधील रुग्ण घराबाहेर पडत असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी शहराच्या विविध भागांतील ३८०० सीटीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विविध भागांत ३८०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी कंट्रोलरूमधून याचे संचालन व नियंत्रण केले जाते. होम आयसोलशनमधील रुग्ण घराबाहेर पडल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. यावर सध्या काम सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
मास्क न घालता शहरात अनेक जण फिरतात. अशा नागरिकांचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जाईल. यात पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध कसा घेता येईल, याचाही अभ्यास सुरू आहे. पालकमंत्री व विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यासाठी स्मार्ट सिटी विभागाला यंत्रणा अधिक अद्ययावत करावी लागणार आहे. तूर्त हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर कार्यान्वित करणे शक्य होईल, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात होम आयसोलेशनमध्ये २० हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. असे रुग्ण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर नजर ठेवणे शक्य नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांचा शोध कसा घेता येईल, यावर काम सुरू आहे.