लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा सण आहे. मात्र, हा सण साजरा करताना अनेकदा अघटित घटना घडतात. त्या घटना घडू नयेत यासाठी सुरक्षितरीत्या दिवाळी साजरी करावी. ग्रीन फटाके लावताना विशेष काळजी घ्यावी. आगीची घटना घडल्यास तत्काळ १०१ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा आपल्या नजीकच्या मनपा अग्निशमन केंद्राला माहिती द्या, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे.
शासनाने ग्रीन फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ग्रीन फटाके फोडताना सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली जावी, असे आवाहन मनपाचे प्रमुख अग्निश्मन अधिकारी राजेंद्र उचके यांनी केले आहे.
फटाके विक्रेत्यांना आवाहन
फटाक्यांची दुकाने लावताना आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. दुकान तयार करताना ज्वलनशील साहित्याचा वापर करू नये, दोन दुकानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, अधिकृत प्रमाणित दर्जाचे फटाके ठेवावे, दुकानाच्या जवळ कुणालाही फटाके फोडू देऊ नये, दुकानात मेणबत्ती, लायटर किंवा आगपेटी जाळू नये, दुकानात धूम्रपान करू नये, इलेक्ट्रिक बल्ब आणि फटाक्यांमध्ये अंतर ठेवावे, अग्निशमन विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार पाणी, रेतीची बादली आणि अग्निशमन यंत्र दुकानात ठेवावे, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाच्या सूचना
-फटाके जाळताना फटाक्यांच्या बॉक्सवरील सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करावे.
- फटाके फोडताना नेहमी पाणी आणि रेतीची बादली जवळ ठेवावी.
- फुलझडी, रॅकेट वापरून झाल्यानंतर त्यांना पाणी किंवा रेतीच्या बादलीत टाकावे.
- घरांच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे, फक्त अधिकृत मानक फटाके वापरावे,.
-फटाक्यांसाठी खुली जागा सुरक्षित असते, वस्तीमध्ये फटाके फोडणे टाळावे.
- सुती कपडे तसेच सुरक्षेचा दृष्टीने बूट आणि चष्मा लावावा,
-फटाके फोडताना वृद्ध, मुले आणि महिलांची काळजी घ्यावी.
- लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नये.
- न फुटलेल्या फटाक्यांना हात लावू नये, घरात किंवा घराच्या अगदी जवळ फटाके फोडू नये.
-फटाक्यांजवळ दिवे, अगरबत्ती किंवा मेणबत्ती ठेवू नये.
- आपल्या परिसरातील ज्वलनशील कचरा नष्ट करावा.
- अनार तसेच वर जाणारे फटाके वस्तीत फोडू नये.