नागपूर : दिवाळी नऊ दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा कमी आवाज, आकाशाला रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम राहणार आहे. गांधीबाग मुख्य बाजारासह स्थानिक बाजारात पारंपरिक, फॅन्सी आणि इको फ्रेंडली प्रदूषण विरहित ग्रीन फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची कमी आवाजाच्या फॅन्सी फटाक्यांना पसंती मिळत आहे. यंदाही फटाका बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.
यावर्षी फटाके १० ते १५ टक्क्यांनी महाग आहेत. फॅन्सी आणि ग्रीन फटाक्यांची रेंज २५० ते ३०० रुपयांपासून आहे. देशात ९९ टक्के फटाक्यांची निर्मिती तामिळनाडू राज्यातील शिवाकाशी येथे होते. बदलत्या काळानुसार लोकांची फटाक्यांच्या बाबतीत पसंती बदलत आहे. पूर्वी कागदी लक्ष्मी बॉम्ब, रस्सी बॉम्ब, ॲटम बॉम्ब या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना जास्त मागणी होती. आता कमी आवाजाच्या फटाक्यांना जास्त पसंती आहे. यामध्ये फॅन्सी मॅजिक पॉप, ड्रॅगन फाईट, मायाजाल, जम्पर, बटरफ्लाय, पॉपकॉर्न, पोगो, एअर ट्रॉफिक, पिंक रोज या फटाक्यांची धूम आहे.
ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर कमी होणार
प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी बाजारात ग्रीन फटाके उपलब्ध आहेत. यात अनार, पेन्सिल, चकरी, फुलझडी आणि सुतळी बॉम्बचा समावेश आहे. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. हे फटाके पारंपरिक फटाक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते.
ठोक व्यापारी ललित कारवटकर यांनी सांगितले की, यंदा बाजारात फॅन्सी फटाक्यांना जास्त मागणी आहे. या फटाक्यांमुळे लखलखाट होतो, पण धूर निघत नाही. रंगोली फटाका, कलर स्मोक, कलर मॅजिक, १६ म्युझिकल आयटम, रॉकेटमध्ये गोल्ड स्टार, गोल्ड बिलो, जस्मीन कॉर, रेड कॉर, पॅराशूट मिसाईल, जम्बो रॉकेट असून, यातून आकाशात एकाचवेळी १०० फटाके उडतात. त्याशिवाय ५ कलर फुलझडी, सिटी पार्क ॲण्ड पॅराडाईज २५० शॉर्ट शॉवर, ट्राय कलर मिलेनियम, मनी स्पीनर आणि म्युझिक रोल आहे. तसेच ग्राऊंड फॅक्टर, जेट फाऊंटेन रेम्बो कलर, अनार यामध्ये सात रंग निघतात. चक्री, स्काय शॉर्ट आणि अनारमध्ये अनेक प्रकार आहेत.
लहानांसाठी विशेष गन्स
खास लहानांसाठी कमी धूर आणि आवाज असणाऱ्या फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. गोल्ड क्वाईन आणि अशरफी पॉटसारख्या जवळपास अधिक प्रकाश देणाऱ्या अनारला चांगली मागणी आहे. ही गन आता हायटेक झाली आहे. स्प्रिंग गनमध्ये टिकली ठेवून फोडल्याने डबल आवाज येतो. सिक्स राऊंड गन जी मॅग्जीनसह आली आहे. किंमत ५० पासून ५०० रुपयांपर्यंत आहे.
ग्रीन फटाके म्हणजे काय
दिवाळीत फुटणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते. पण त्यावर उपाय म्हणून सरकारच्या आदेशानुसार उत्पादकांनी इको फ्रेंडली आणि प्रदूषणविरहित ग्रीन फटाके यंदाही बाजारात आणले आहेत. ग्रीन फटाके ओळखण्यासाठी विशेष लोगो फटाक्यांच्या पाकिटावर देण्यात आला आहे. ग्रीन फटाके वाजविताना मोठा आवाज आणि आकर्षक रोषणाईदेखील दिसते. यात वापरण्यात आलेल्या घटकांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. सामान्य फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाके महाग आहेत. किरकोळ बाजारात या फटाक्यांचे दर २०० रुपयांपासून आहेत. सध्या बाजारात ग्रीन फटाक्यांची संख्या कमी असली तरी जास्तीत जास्त फटाके आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.