नागपूर : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणाचा आरोपींनी शस्त्रांनी वार करून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री कोतवाली ठाण्यांतर्गत शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
मनिष यादव (२५, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपीत गणेश उर्फ दादू मांडले (१९, भुतेश्वरनगर), नीलेश भुरे (२६, शिवाजीनगर) आणि श्याम वासनिक (१९, कुंभारटोली) यांचा समावेश आहे. मनिष महाल परिसरात फळाच्या दुकानात काम करतो. आरोपी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्काराचे काम करतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांना नशेची सवय आहे. मंगळवारी मनिषचा वाढदिवस होता. मनिषने दुकान बंद करून आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर मनिष घरी परतला. भोजन केल्यानंतर रात्री ११.४५ वाजता घरून निघाला. तो शिवाजीनगर चौकात पोहोचला. तेथे आरोपी गांजा पीत होते. मनिषचा आरोपींशी वाद झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. दरम्यान, आरोपींनी धारदार शस्त्राने मनिषवर हल्ला केला. पोट, छातीवर वार करून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मनिषला रुग्णालयात नेले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. चौकशीत पोलिसांना मनिषचा आरोपींशी वाद झाल्याचे समजले. बुधवारी पहाटे पोलिसांनी आरोपींना अटक केली. शिवाजीनगरात खुलेआम मादक पदार्थांची विक्री होते. तेथे कुख्यात आरोपी राहतात. आरोपी अवैध धंद्यात सक्रिय आहेत. पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे ते गुन्हेगारी घटना घडवून आणतात. गंगाबाई घाटावर सक्रिय असलेल्या आरोपींनी खून आणि दुसरे गंभीर गुन्हे केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. येथील घटनांकडे पोलीस गंभीरतेने पाहत नाहीत.
गंमत खरी ठरली
मनिषने वाढदिवस साजरा करताना आज माझा वाढदिवस साजरा करा, उद्या मृत्यू दिन साजरा करा, असे मित्रांना म्हटले होते. त्याच्या खुनाची घटना समजल्यानंतर त्याचे शब्द खरे झाल्याचे मित्रांना वाटत आहे. सूत्रांनुसार मनिषचे लग्न ठरले आहे. १२ एप्रिलला त्याचे लग्न होणार होते. त्याची आरोपींशी ओळख नव्हती किंवा वादही नव्हता. क्षुल्लक वादातून आरोपींनी त्याचा खून केला.