निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीचा जन्म झाला आणि त्या कुटुंबात आनंदाला पारवार उरला नाही. जणू त्या गोष्टीची अपेक्षाच केली होती. आठवडाभर आईसह ती रुग्णालयातच होती आणि तिच्या घरी आगमनाचा दिवस येऊन ठेपला. संपूर्ण घर आणि परिसर रंगीबेरंगी फुलांनी, फुग्यांनी सजविण्यात आले. गेटपासून खोलीपर्यंत रेड कार्पेटप्रमाणे फुलांचा गालिचा टाकण्यात आला. उत्साहपूर्ण संगीत आणि नातेवाईकांची लगबग तयारीत लागली होती. गुलाबी रंगाने न्हालेल्या घरी अखेर आईसोबत त्या चिमुकलीचे आगमन झाले आणि उपस्थितांनी एक उत्सव साजरा केला.बाळ जन्मल्याचा व घरी आगमनाचा प्रत्येकाला आनंद असतोच पण मुलगी जन्मल्यानंतर तिच्या आगमनाचे असे धूमधडाक्यात, रेड कार्पेट टाकून स्वागत करण्याचा क्षण म्हाळगीनगरजवळच्या गुरुदेवनगर येथील विक्रम व मोनाली चौधरी या दांपत्याच्या घरी अनुभवायला मिळाला. विक्रम चौधरी मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. त्यांची पत्नी गरोदर होती. काय होईल हे माहिती नव्हते पण मुलगीच व्हावी ही त्यांच्या घरी प्रत्येकाची इच्छा. गांधी जयंती म्हणजेच २ आॅक्टोबर रोजी त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि त्यांची कामना पूर्ण झाली. हा आनंदाचा क्षण चिरकाळ आठवणीत राहील असा साजरा करायचा, हा निर्धार त्यांनी केला. ७ आॅक्टोबरला रुग्णालयातून आई आणि मुलीला घरी आणायचे होते. त्यांनी सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले. आप्तेष्टही हा मुलगी जन्माचा सोहळा अनुभवायला हजर झाले. पिंक रंगाने त्यांचे घर सजले आणि चिमुकलीच्या आगमनाचा अनोखा सोहळा सर्वांनी मनात साठवला. तिच्या इवल्याशा पाऊलखुणा फोटोफ्रेममध्ये जतन करून ठेवण्यात आल्या.आज जगातील सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. बऱ्यापैकी दृष्टिकोनही बदलला आहे. मात्र अद्यापही मुलींबाबत ‘नकोशी’ म्हणून असलेली मानसिकता बदलल्याचे दिसत नाही. त्यातही दर दिवशी महिला अत्याचाराबाबत वाढणारे आकडे कुठेतरी मनात उदासीनता निर्माण करीत असतात. अशा निराशादायक स्थितीत विक्रम चौधरी यांच्यासारख्या व्यक्तीकडून येणारे हे अनुभव मोठा दिलासा देऊन जातात.बहुतेकांना मुली नकोशा असतात. मुली, महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना पाहून मन उदास होते. त्यामुळे मुलगीच व्हावी, ही इच्छा होती. मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत, हे समाजाला दाखवून द्यायचे होते म्हणून ठरवूनच हा आनंदोत्सव केला.- विक्रम चौधरी, मुलीचे पिता