नव्वदीपूर्तीनिमित्त तु. वि. गेडाम यांचा सत्कारनागपूर : समाजात डोके ठेवावे असे पायच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे एखाद्या गुणी व्यक्तीचा समाजाने पुढाकार घेऊन गुणवत्तेच्या भरवशावर सत्कार केल्यास तो समाज प्रगतिशील असतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.सुप्रसिद्ध संशोधक, विचारवंत डॉ. तु. वि. गेडाम यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. गोपीराजबाबा शास्त्री होते. व्यासपीठावर रनाईचे उपाध्यकुलाचार्य बिडकरबाबा, सुभद्रा शास्त्री कपाटे, माहुरकरबाबा शास्त्री, डॉ. सोनेपेठकर, कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजू मानकर, केशरताई मेश्राम, अॅड. के. आर. शेंडे, दिवाकरबाबा गुर्जर, प्रा. राष्ट्रपाल मेश्राम उपस्थित होते. केशरताई मेश्राम म्हणाल्या, नव्या पिढीने तु. वि. गेडाम यांचा आदर्श घेतल्यास या सत्काराचे फलित होणार आहे. अॅड. के. आर. शेंडे यांनी साहित्याच्या माध्यमातून चक्रधरस्वामींचे विचार ग्रामीण भागात पोहोचविल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. राजू मानकर म्हणाले, समाजासाठी केलेल्या विधायक कामामुळे ९० वर्षाच्या वयातही त्यांना ऊर्जा मिळत असून त्यातूनच ते सकारात्मक दृष्टीने कार्य करतात. कृष्णा आयुुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ कऱ्हाडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी संतांनी एका गुणवंत व्यक्तीच्या सत्कारासाठी पुढाकार घ्यावा यातून संत परंपरेत नवा आदर्श निर्माण झाल्याचे सांगितले. आचार्य सोनेपेठकर यांनी समाजाची घडण, मनुष्याचे कल्याण हे सूत्र घेऊन गेडामांनी कार्य केल्याची माहिती दिली. माहूरकरबाबा यांनी समाजकार्य करताना धर्म कार्याचा गेडाम यांना विसर पडला नसल्याचे सांगितले. आचार्य आत्याबाई यांनी उर्वरित आयुष्यात गेडाम यांच्याकडून समाजसेवा आणि धर्मसेवा घडावी, असे मत व्यक्त केले. मकरधोकडाचे न्यायंबासबाबा शास्त्री यांनी माणसाचे जीवन पाण्याप्रमाणे असून त्याला योग्य दिशा न मिळाल्यास ते वाया जात असल्याचे सांगितले. नागराजबाबा शास्त्री यांनी गेडाम यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. समारंभात डॉ. तु. वि. गेडाम, प्रभाताई गेडाम यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ९० हजाराची पिशवी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवग्रंथ आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले. (प्रतिनिधी)
एक सोहळा कर्तृत्वाचा अन् गौरवाचा
By admin | Published: August 04, 2014 12:57 AM