मुख्य समारंभ शुक्रवारी : थायलंडचे मेजर जनरल पोमपेच्च मुख्य अतिथी नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाला मंगळवार ३० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मुख्य सोहळा ३ आॅक्टोबर रोजी होणार असून थायलंडचे मेजर जनरल थानसक पोमपेच्च व ज्येष्ठ पत्रकार डॉ. रंगथिप चोटनापलाई हे थायलंड सरकारचे प्रतिनिधी म्हणून या वर्षी मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. यासोबतच थायलंडमधील ३८ बौद्ध विचारवंत सुद्धा सहभागी होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी शुक्रवारी यासंबंधात पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात राजकीय नेत्यांची उपस्थिती राहणार नाही. केरळचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सू. गवई हे अध्यक्षस्थानी राहतील. थायलंडचे दोन्ही मुख्य अतिथी हे थायलंड सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत. याशिवाय महापौर प्रवीण दटके हे सुद्धा प्रमुख पाहुणे राहतील. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या संमेलनाने या समारोहाची सुरुवात केली जाईल. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता महिला परिषद होईल. २ आॅक्टोबर रोजी पंचशीलचे ध्वजारोहण करण्यात येईल. स्मारक समितीचे सदस्य भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, विजय चिकाटे, विलास गजघाटे, कैलास वारके, एस.के. गजभिये, प्रा. ए.पी. जोशी, प्राचार्य प्रकाश खरात, गौरीशंकर डोंगरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)बुधवारपासून धम्मदीक्षा दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार १ आॅक्टोबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाईल. दीक्षा घेणाऱ्या प्रत्येकाला स्मारक समितीच्यावतीने प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. गुरुवारी जागतिक धम्मपरिषद गुरुवार २ आॅक्टोबर रोजी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक धम्मपरिषद होईल. या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते करण्यात येईल. परिषदेत थायलंड, जपान, कम्बोडिया, श्रीलंका, लाओस इत्यादी देशातील भिक्खू व बौद्ध नेते मार्गदर्शन करतील. मुख्य समारंभाचे थेट प्रसारण शुक्रवारी ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण सायंकाळी ५ वाजेपासून लॉर्ड बुद्धा, आवाज इंडिया, महाबोधी आणि युसीएन या वाहिनीवरून होणार आहे.
दीक्षाभूमीवरील समारंभ मंगळवारपासून
By admin | Published: September 28, 2014 1:03 AM