लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग म्हणजे ‘कोड’ पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही. यावर पेशी रोपण ही प्रक्रियाही महत्त्वाचे ठरते, अशी माहिती मुंबई येथील त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती घिया यांनी दिली.‘क्युटीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. डॉ. घिया म्हणाल्या, पेशीरोपणमध्ये रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो. त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते. पेशीरोपण शरीराच्या कोणत्याही भागात करता येते. डागांमध्ये रंगपेशी सोडल्यानंतर त्या आपले रंग तयार करण्याचे काम करू लागतात, आणि डागाला मूळ त्वचेसारखा रंग येऊ लागतो.‘फंगल इन्फेक्शन’ वाढतेय -डॉ. शेनॉय कर्नाटक येथील त्वचारोग तज्ज्ञ मंजुनाथ शेनॉय म्हणाले, पूर्वी ‘फंगल इन्फेक्शन’ (बुरशीजन्य संसर्ग) आजार साधारण दोन महिन्यात बरा व्हायचा परंतु आता वर्ष लागते. या आजारात ‘म्युटेशन’ (उत्परीवर्तन) झाले आहे. परिणामी, पूर्वी शरीराच्या एक-दोन ठिकाणी या आजाराचा ‘पॅच’ दिसून यायचा. अलीकडे संपूर्ण शरीरावर हा आजार दिसून येतो. ‘ग्लोबल वार्मिंग’, वाढते प्रदूषण, घट्ट असणारे कपडे, एकच जिन्स दहा-दहा दिवस घालणे आदींमुळे हा आजार वाढतोय. यात स्वत:हून औषधोपचार करणे धोकादायक ठरत आहे. कारण, यातील बहुसंख्य क्रिम्समध्ये ‘स्ट्राँग स्टेरॉईड्स’ राहात असल्याने हा आजार आणखी गंभीर होत आहे, या आजरावर मोजून चार औषधी आहेत. यातील केवळ एकच औषध प्रभावी ठरत असून इतर तीन औषधांना हा आजार जुमानत नसल्याचे किंवा त्याचा प्रभाव कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच या आजाराची डॉक्टरांमध्ये व रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ तयार केले आहे.डॉ. बालचंद्र अंकद म्हणाले, पूर्वी त्वचारोगाचे निदान करण्यासाठी अर्धा सेंटीमीटर त्वचा काढून प्रयोगशाळेत तपासणी करावी लागायची. परंतु आता ‘डर्माेस्कोपी’मुळे ‘ओपीडी’मध्येच रुग्णाच्या त्वचारोगाचे निदान होणे शक्य झाले आहे. त्वचेवरील ‘सोरायसीस’, काळ्या डागाचे ‘मेलॅनिन’, ‘फंगल इन्फेक्शन’ याचे तातडीने निदान होते. विशेष म्हणजे, केसगळती कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती या उपकरणाच्या मदतीने मिळू शकते. परिणामी, त्या प्रकाराचे औषधोपचार केल्यास ते प्रभावी ठरतात. त्वचेवरील कॅन्सरच्या निदानामध्येही याचा उपयोग होतो.