जनमंचने केली तपासणी : जुनी शुक्रवारी ते रेशीमबाग चौक रोडचे काम निकृष्ट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु या रोडची कामे निकृ ष्ट दर्जाची असल्याबाबत तक्रारींचा ओघ सुरू आहे. यातील तथ्य जाणून घेण्यासाठी जनमंचतर्फे सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. गुरुवारी जुनी शुक्रवारी ते रेशीमबाग चौक सिमेंट रोडची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी रोडवरील सिमेंटचा थर निघालेला आहे. तसेच काही भागात २० ते २५ फूट लांबीच्या भेगा पडल्या असून कामात अनेक त्रुटी आढळल्या. या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. शहरातील सिमेंट रोडच्या पहिल्या टप्प्यात जुनी शुक्रवारी चौक ते रेशीमबाग चौक या १८५० मीटर लांबीच्या रोडचे काम हाती घेण्यात आले. युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट हे कंत्राटदार आहेत. एका बाजूचा सिमेंट रोड २०११ मध्ये तर दुसऱ्या बाजूचा २०१२ मध्ये पूर्ण करण्यात आला. २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत या रोडचा पूर्णत्व कालावधी आहे. या रोडचे काम पूर्ण झाले आहे. सिमेंट रोडचे आयुष्य ३० वर्षांचे गृहित धरण्यात आले आहे. मात्र या रोडच्या कामाला चार ते पाच वर्षांचा कालावधी झाला असतानाच रोडवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रेशीमबाग चौकाच्या डाव्या बाजूला रोडवरील सिमेंटचा थर निघाला आहे. गिट्टी व रेती बाहेर पडण्याची शक्यता काही. काही ठिकाणी रोडवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. जुनी शुक्रवारी चौकाच्या बाजूला तसेच बांधकाम सुरू असलेल्या सुरेश भट सभागृहासमोरील रोडवर १५ ते २२ फूट लांबीच्या भेगा पडलेल्या आहेत. दर्जेदार कामासाठी तपासणी जनमंचने १ मे पासून सिमेंट रोडची सार्वजनिक तपासणी सुरू केली आहे. या लोकभावनेची दखल घेत तपासणीला महापालिकेने संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे. सिमेंट रोडची तपासणी अनुभवी सिव्हिल इंजिनिअर अमिताभ पावडे यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांच्या चमूकडून केली जात आहे. तपासणीदरम्यान रोडवरील नुसत्या भेगा शोधत नसून रस्ता, त्याच्या दुभाजकांना लावलेले उभे दगड, पुलावर व फुटपाथवर लावलेले समांतर गट्टू , पावसाळी नाल्या, त्यावरील झाक णे अशा बाबींची पाहणी करीत आहोत. इंडियन रोड काँग्रेसच्या मानकाच्या आधारे हे रोड बांधले जात आहेत. त्या मानकाची प्रत आम्ही महापालिका आयुक्तांना मागितली आहे. काही ठिकाणी कोइर कटिंग सॅम्पल घेण्याला अनुमती दिली आहे. जनमंच ही गैरराजकीय संस्था आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी व जनकल्याणाच्या योजना राबविणारी नि:स्वार्थ संस्था आहे. सिमेंट रोडची तपासणी करताना जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा. शहरातील रस्ते दर्जेदार व्हावे. हा उद्देश आहे. दर्जा चांगला असेल तर स्वागतच करू. जनतेच्या वतीने चांगल्या कामासाठी प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही लढत आहोत. अनिल किलोर, अध्यक्ष जनमंच
सिमेंट रोडवर भेगा; थरही निघाला
By admin | Published: May 19, 2017 2:44 AM