नागपूर : भविष्यात पर्यावरण जगण्यायाेग्य राहण्यासाठी वृक्षसंवर्धनाची किती गरज आहे, हे वारंवार सांगण्याची तशी गरज नाही. मात्र जबाबदार यंत्रणाच बेजबाबदारपणे वागून झाडांच्या जिवावर उठल्याचे दिसून येते. वर्धा राेडकडून विमानतळाकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर असाच प्रकार दिसून येताे. येथे रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र बांधकाम करताना कडेला असलेल्या झाडांना जगविण्याऐवजी हळूहळू मारण्याचेच नियाेजन केले जात आहे का, असे चित्र दिसून येत आहे.
या परिसरात नेहमी सायकलिंग करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ता समीर कुळकर्णी यांनी अनेक दिवस निरीक्षण करून ही बाब ‘लाेकमत’च्या समाेर आणून दिली आहे. त्यांच्या मते या डांबरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची तशी काहीच गरज नव्हती. मात्र सिमेंट रस्ता बांधण्यात येत आहे. रस्ता बनविताना कडेला असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन हाेईल, असे नियाेजन करणे गरजेचे आहे.
नियमानुसार झाडाला पाणी शोषून घेता येईल एवढी जागा साेडणे गरजेचे आहे. त्यासाठी एक ते दीड मीटर जागा साेडावी आणि बुंध्याभाेवती कठडे बनविणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांची ऐसीतैशी केली जात असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.
एकतर कंत्राटदाराने झाडाजवळून अर्धा फूट जागाही न साेडता सिमेंट रस्त्याचे काम चालविले आहे. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीकडून जागा साेडली असली तरी फूटपाथ बनविल्यानंतर तिही सुटणार नाही. दुसरे म्हणजे झाडांची मुळे एकाच दिशेने पसरत नाही हेही महत्त्वाचे. त्यामुळे पुढे पाणी शोषून घेण्याची जागाच उरणार नाही तर ते झाड जगेल कसे.
याशिवाय पुढच्या काळात रस्ता रुंद झाल्याने वाहतुकीला अडथळा हाेते म्हणून त्या झाडांना कापण्यासही यंत्रणा मागेपुढे पाहणार नाही. आणखी धक्कादायक म्हणजे झाडाच्या बुंध्याभाेवती माती टाकण्याऐवजी कंत्राटदाराने काॅंंक्रीटचा मलबा टाकला आहे. अशा प्रकारामुळे जमिनीतून जीवनसत्वे शाेषणासाठी या झाडांना माेकळीक मिळणार नाही आणि हळूहळू ती झाडे मरणासन्न हाेतील, अशी भीती कुळकर्णी यांनी व्यक्त केली. या रस्त्यावरील ५० ते १०० वर्ष वयाची १५ ते २० झाडांना रस्ते बांधकामाच्या चुकीच्या नियाेजनाचा फटका बसणार आहे, हे निश्चित.