लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगदी लहानपणापासून ओळख होते ती चिमणीची! ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा...’असे म्हणत बाळाला घास भरवणारी आई आणि ‘ये ग, ये ग चिऊ...’म्हणत मनात पक्षिप्रेम जागविणारं बाळ ही आपल्या संस्कृतीमधील निसर्गमैत्रीची खूण होती. आज बदललेल्या युगात अंगण हरवलं, अंगणातील माती हरवून सिमेंटच्या टाईल्स आल्या आणि दुर्दैवाने या मातीत खेळणाऱ्या चिमण्याही लुप्त होत चालल्या.
माणसाच्या अगदी जवळ राहणारा हा पक्षी मागील १५-२० वर्षांत बराच कमी झाला आहे. वाढते मोबाईल टॉवर आणि डिश ॲन्टेनांचे कारण यासाठी सांगितले जात असले तरी शहरांमध्ये उभी होत चाललेली सिमेंटची जंगल, रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि शहरातून कमी होत असलेले मातीचे प्रमाणही यासाठी कारणीभूत मानले जात आहे. वाघ, गिधाडे दुर्मीळ होत चालले म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करतो. मात्र, आपल्या अंगणातील चिमणी लुप्त होत चालली, याकडे कुणाचेच लक्ष नाही.
नेचर फॉरेव्हर सोसायटीने काही संस्थांच्या सहकार्याने २० मार्च २०१० पासून जागतिक स्तरावर चिमणी दिवस सुरू केला. जगभरातून या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ३० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. चिमणी कशी वाचवता येईल, याचा अभ्यास करून कृत्रिम घरट्यांचे प्रयोग राबविले गेले. परंतु माणसावर रुसून दूर पळालेली चिमणी अद्यापही जवळ आलेली नाही.
चिमणी गणना नाही
‘एनएफएस’ (नेचर फॉरेव्हर सोसायटी) या संस्थेच्या माहितीनुसार, भारताशिवाय जगातील इतर देशांमध्ये एका ठराविक कालावधीत चिमणी गणना केली जाते. त्यामुळे चिमण्यांचे प्रमाण, वाढ याविषयी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते. भारतात मात्र चिमणी गणना होत नसल्याने त्यांच्या संख्येविषयी माहिती कुठेच उपलब्ध नाही. द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर(आययूसीएन)ने सामान्य घरात आढळणाऱ्या चिमणीची नोंद अत्यंत संकटग्रस्त प्रजातीमध्ये केली आहे.
...
नष्ट होण्याची कारणे
- उद्यानांमध्ये झाडे लावण्यात आली असली तरी पर्यावरणपूरक आणि पक्ष्यांना विसावता येईल, अशी झाडे नाहीत.
- पर्यावरणाचा ढासळता समतोल आणि मनुष्याची निसर्गातील वाढती ढवळाढवळ
- बेसुमार वृक्षतोड आणि झपाट्याने वाढणारे शहरीकरण
- डिश ॲन्टेना, मोबाईल टॉवरमधून होणारे किरणोत्सर्जन.
- पूर्वी वाडा पद्धतीमुळे चिमण्या मानवी वस्तीत राहत होत्या. अलीकडे बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये कोनाडे नसल्याने त्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच नाहीत.
- ध्वनिप्रदूषण व फटाक्यांच्या आवाजामुळेही पक्ष्यांचे स्थलांतर होते. प्रचंड आवाजाने पक्षी घाबरतात व आपली वस्तीस्थळे सोडून निघून जातात.
- पेस्ट्रीसाईडमुळे कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. या कीटकांवर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
...