जनहित याचिका दाखल : कामात गुणवत्ता नसल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रोडचे काम सुरू असून अनेक सिमेंट रोडचे काम पूर्ण झाले आहे. सिमेंट रोड दर्जेदार बनविले जात नसल्यामुळे अभियंते योगेश नागपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना सिमेंट रोडचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे सिमेंट रोड तयार करताना अनेक तांत्रिक चुका होत आहेत. शहरातील बहुतेक सिमेंट रोडचे काम गुणवत्ताहीन आहे. सिमेंट रोड बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याला काही दिवसांतच भेगा जात आहेत. काही सिमेंट रोड उखरून रेती बाहेर आली आहे. याशिवाय सिमेंट रोडचे काम संथ गतीने होत आहे. कंत्राटामध्ये ठरवून दिलेला कालावधी पाळला जात नसल्याचे लक्षात आले आहे. अतिरिक्त खर्च वाचविण्यासाठी काम वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.या कामासाठी शेवटी करदात्यांचाच पैसा वापरला जात आहे. त्यामुळे कामातील भ्रष्टाचार थांबविणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक कंत्राटदाराने केलेल्या कामाची व त्यांना मिळालेल्या कंत्राटाची चौकशी झाली पाहिजे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. —————————— ‘लोकमत’ने वेधले लक्ष शहरातील सिमेंट रोडचे काम गुणवत्ताहीन पद्धतीने होत असल्याचे व अनेक नवीन सिमेंट रोड उखडल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशात आणली. यासंदर्भात ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी ‘आॅन दि स्पॉट’ जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली होती. त्यामुळे याप्रकरणाला वाचा फुटली.
सिमेंट रोडचा वाद हायकोर्टात
By admin | Published: May 20, 2017 2:48 AM