लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिप्टी सिग्नल येथील सिमेंट रोडचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. कामात दिरंगाई केल्याप्रकरणी कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग यांना दंड आकारण्यात आला आहे. शिवाय कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन, अत्यावश्यक सेवेतील गैरहजर धरमपेठ झोनचे अधिकारी व कर्मचारी तसेच लकडंगज झोनमधील बोगस मस्टर प्रकरणात झोनल अधिकारी यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मंगळवारी दिले.स्थायी समितीची सभा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. यावेळी झलके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, निगम सचिव तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.डिप्टी सिग्नल परिसरातील सिमेंट रोडच्या कामात दिरंगाई झाली. गेल्या दोन वर्षांपासून सिमेंट रोडचे काम रखडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कंत्राटदार अभि इंजिनिअरिंग या कंपनीवर कडक कारवाई करीत दंड आकारण्यात यावा, तसेच संबंधित कार्यकारी अभियंता दिलीप बिसेन यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.धरमपेठ झोनमध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले काही अधिकारी आणि कर्मचारी रविवारी जोराचा पाऊस आला असतानाही गैरहजर असल्याने तसेच लकडगंज झोनमध्ये कनिष्ठ निरीक्षकास मलवाहक जमादार म्हणून हजेरी मस्टरवर दाखविण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित झोनल अधिकाऱ्याला कारणे द्या नोटीस बजावून या प्रकाराची अतिरिक्त आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देशही दिले.नदी आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. यासाठी ओसीडब्ल्यू, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर मेट्रो आदींचा सहभाग होता. मनपास केवळ इंधनाचा खर्च उचलावा लागला. समितीने निर्देश दिल्यानंतरही बैठकीला आयुक्त उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.नगर रचना विभागाचे काम ठप्प१ जानेवारी २०२० पासून इमारत बांधकाम मंजुरीचे आजपर्यंत एकूण ६६४ अर्ज आले. त्यापैकी २४२ प्रकरणे मंजूर झाली असून, २५८ प्रकरणे नामंजूर झाली तसेच १६४ प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी नगर रचना विभागाचे २१६ कोटी उत्पन्न प्राप्त झाले. त्यातुलनेत सन २०२०-२१ मध्ये केवळ ३५ कोटी उत्पन्न झाले. विभागाचे काम ठप्प असल्यावर झलके यांनी नाराजी व्यक्त केली.
सिमेंट रोड : मनपा कार्यकारी अभियंत्यासह तिघांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:06 PM