नागपूर : झोपडपट्ट्यांचे शहर ही देखील नागपूरची एक ओळख बनत आहे. झोपडपट्टीधारकांना सिमेंटचे छत देऊन ती पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांढराबोडी, संजयनगरमध्ये नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. परिसरातील हजारावर झोपडपट्टीधारकांना हक्काचे सिमेंटचे छत मिळाले आहे. या घरांची पाहणी नगरसेवक फुके यांनी केली. यावेळी गरिबांना सिमेंटचे घर मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. ‘शांघाय’ या चित्रपटात ‘सोने की चिडिया, डेंग्यू मलेरिया’ या गाण्याने भारताच्या काही भागांची खरी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला होता. जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीयांचे नाव असले तरीसुद्धा देशातील ६५ कोटी जनता ही झोपडपट्टीत राहते, हे सुद्धा एक सत्य आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. नगरविकास मंत्रालयातर्फे ‘बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर’ या योजनेंतर्गत झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्यात येतात. संपूर्ण झोपडपट्टी तोडून तेथे ३३ चौरस फुटात ही घरे बांधली जातात. झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या झोपड्यांच्या जागेवर ही घरे बांधून देण्यात आली. यात केंद्रातर्फे ५० टक्के, राज्य सरकारतर्फे ३० टक्के तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि लाभार्थ्यातर्फे प्रत्येकी १० टक्के गुंतवणूक केली जाते. शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये केंद्राची ही योजना राबविण्यात येत आहे. पांढराबोडी, संजयनगरमध्ये ही योजना सर्वप्रथम पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. याचे श्रेय या भागातील नागरिक नगरसेवक डॉ. परिणय फुके यांना देतात. झोपडपट्टीवासीयांना नव्या योजनेचे महत्त्व पटवून देणे, लोकांना त्यासाठी तयार करणे, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे ही कामे नगरसेवक फुके यांच्यामुळे यशस्वी झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या योजनेसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून, झोपडपट्टीधारकांना १ बीएचके फ्लॅट मिळाले आहेत. (प्रतिनिधी)
पांढराबोडीच्या झोपडीधारकांना मिळाले सिमेंटचे छत
By admin | Published: August 28, 2014 2:04 AM